आपल्या संस्कृतीत शुद्ध तूपाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रसंग कोणताही असो आनंदाचा, दुःखाचा, सण-वार, लग्न-समारंभ शुद्ध तुप आवश्यकच आहे. जेवणाच्या पंगतीतही तूप वाढल्याशिवाय जेवणं सुरू नाही होत. तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळें दुधातील अ, ड, इ आणी क ही जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थ जास्त असतात त्यामुळे त्याचे तूप जास्त उतरते. आयुर्वेदात तूप सेवनाचे अनेक फायदे सांगितले आहेत. तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते. तुपामुळे वजन वाढते असा गैरसमज आहे पण तुपाच्या सेवनामुळे वजन कमी होण्यास मदत होते असे आयुर्वेद सांगते. तुपामुळे बुद्धी आणि स्मृती वाढते. शुद्ध तूप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते. जेवताना पहिल्या घासावर तूप टाकून घ्यावे म्हणजे अन्नशुद्धी होतें आणि लवकर पचते. आता म्हणाल बाजारात तर तूप सहज मिळते मग एवढा घाट कशासाठी घालायचा? पण बाजारात मिळणाऱ्या तूपात बऱ्याच पदार्थांची भेसळ असतें . म्हणून ते शक्यतो घरच्या घरी बनवावे. खाली दिलेली तुपाची कृती अत्यंत सोपी आहे.
साहित्य
मलई(सायीचे) दही
जाड बुडाचे भांडे लोणी कढविण्यासाठी
१ लिटर गार पाणी
२ कप गरम पाणी
मिक्सरचे मोठे भांडे
स्टीलची गाळणी तूप गाळण्यासाठी
कृती
साईचे दही कसे लावायचे?
उकललेलं दूध ५-६ तास फ्रीजमध्ये ठेवले की दाट साय येते. ती साय एका काचेच्या भांड्यात काढून घ्यावी आणि २ चमचे दही टाकून छान ढवळून २-३ तास फ्रीजच्या बाहेर ठेवावं. म्हणजे साय आंबुस होते आणि लवकर खराब नाही होत. अशाच प्रकारे रोजची साय त्या भांड्यात जमा करावी. २ दिवसांनी एखादा चमचा दही टाकून मिश्रण ढवळून थोडावेळ बाहेर ठेवून परत फ्रिजमध्ये ठेवावं. कारण वरतून साय पडत जाते आणि सगळ्या साईत आंबटपणा मुरत नाही परिणामी साय हिरवी पडून खराब होते. जास्तीची साय जमा न करता आठवडाभराचीच जमा करावी.
लोणी कसं करावं?
साईचे दही गारं पाणी घालून घुसळले की लोणी तयार होते. पारंपारिक पद्धतीने दही आणि पाणी रवीने घुसळून लोणी काढतात. किंवा मिक्सरच्या भांड्यात एक ग्लास गार पाणी आणि एक डाव दही टाकून ३-४ वेळा फिरविले की लोणी होतं. किंवा ब्लेंडर ने डायरेक्ट दही आणि पाणी मिसळवून लोणी काढता येतं. ताकवरचं लोणी काढायच्या आधी हात गरम पाण्यात बुडवून लगेच लोणी काढले की लोणी हाताला चिटकत नाही आणि हात तुपकट नाही होत. अशाप्रकारे लोणी एका जाड भांड्यात जमा करावे. आणि लोण्यातील जे थोडं थोडं ताक निघतं ते ताकाच्या भांड्यात ओतावे. आता लोण्यात पाणी टाकून लोणी धुवून काढावे. तूप कढविण्यासाठी लोणी तयार आहे.
लोणी कसे कढवयाचे?
पाव किलो लोणी असेल तर एक लिटरचे जाड बुडाचे भांडे (कॉपर बेसचे असेल तर उत्तम) घ्यावे. त्यात लोणी ओतून ते भांडं गॅसवर ठेवावे. गॅस मंदच हवा नाहीतर लोणी फसफसून उतू जाते. मिश्रण सुरुवातीला फेसाळ नंतर दुधाळ दिसतें. अधून मधून मिश्रण ढवळायचे आहे म्हणजे बुडात जास्त बेरी राहत नाही. तूप कढत आले की दाटसर तूप दिसतं. म्हणजे तूप जवळपास कढलं आहे. अर्ध्या मिनिटात मिश्रण लालसर होतं आलं की गॅस बंद करावा. भांड्याच्या उष्णतेमुळे ते आपोआप लालसर होते. तूप खूपच लालसर होत असेल तर पाण्याचा एक हबका मारावा म्हणजे तूप जळत नाही. चर्रर् असा आवाज येतो.
तूप कसे साठवावे?
तूपासाठीचा डबा प्लास्टिकचा नको. स्टील, काचेचा चालेल, चांदीचा गडू सगळ्यात उत्तम. डबा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यावा. तूप कोमट असतानाच स्टीलच्या गाळणीने गाळून घ्यावे(तूप गाळण्यासाठी बाजारात वेगळी गाळणी मिळते). गार झाल्यावर झाकण लावून ठेवावे. तूप कधीही फ्रिझमध्ये ठेऊ नये. घट्ट तूप गरम करताना ते डायरेक्ट गॅस वर न ठेवता गरम पाण्यात गडू ठेऊन करावे.
टीप- तूप काढविताना चिमूटभर मीठ आणि साखर टाकली तर बेरी कमी होते म्हणतात. बरेचजण विड्याचे पान टाकतात कारण पानात कॅल्शियम असते आणि तुपाच्या कणांना मोठे होण्यास मदत होते आणि तूप रवाळ बनते. २-३लवंगाही टाकतात म्हणजे चांगला सुवास येतो.
Bhakti D MBA in HR and Finance who found her love and passion in cooking and writing. She enjoys experimenting new recipes as much as enjoy playing with her son, she also brings her expertise as a parent and a qualified professional to WSL