शेवळी/शेवळा ही पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ आणि दुर्गम आदिवासी भागात येणारी रानभाजी आहे. ही भाजी खाल्ल्याने पावसाळ्यात होणाऱ्या अनेक रोगांपासून आपले रक्षण होते असे आदिवासी भागात म्हटले जाते. ह्या भाजीत भरपूर जीवनसत्त्वे असतात म्हणून वर्षांतून एकदातरी ही भाजी खावी. मुंबईमधे ज्या भागात आदिवासी वस्ती आहे तिथे ही भाजी मिळते वसई-विरार, ठाणे, पनवेल मधे मिळू शकते. भाजी बारीक कापून कुरकुरीत तळून फ्रीझरमध्ये ठेवली तर ६ महिने चांगली राहू शकते.
वरची पानें काढून टाकली जातात. आतमधली पानें धुवून बारीक चिरून भाजीत वापरू शकतो. वरची पानें काढल्यावर आतमध्ये एक कांंडी दिसेल त्या कांंडीचा वरचा पिवळा भाग कापून फेकून द्यायचा आहे कारण तो खाजरा असतो.
ही भाजी करण्याच्या बऱ्याच पध्दती आहे काही जण फक्त शेवळींची रस्सा किंवा सुक्की भाजी करतात. काहीजण मोडाच्या धान्यासोबत करतात, काहीजण काकडा घालून करतात आणि काहीजण मांसाहारी पदार्थ घालून करतात. कशीही करा ती छानच लागते.
साहित्य:
७-८शेवळीच्या कांड्या
२ मध्यम आकाराचे कांदे
१ वाटी सुके खोबरं किस
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा धने, १ चमचा जिरं
३ लवंगा
लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आवडीप्रमाणे
थोडी चिंच
चवीपुरता गूळ
४ चमचे तेलं
फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता
सजावटीसाठी कोथिंबीर
कृती:
– सर्वप्रथम शेवळीचे वरचे पानं काढून आतली पानं आणि कांड्या वेगळ्या करून घ्या. पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
– कांड्याचा पिवळा भाग कापून फेकून द्या.
– बाकीचा भाग बारीक चिरून घ्या.
– चिरलेली पानं आणि कांड्या पाण्यामध्ये १० मिनीटं उकळवून घ्या. उकळलेलं पाणी टाकून द्या.उकळताना पाण्यात चिंच टाका म्हणजे भाजी खाजरी नाही होत.
– आता किसलेलं खोबरं, कांदा, लसूण, जिरं, धने आणि लवंगा एका कढईत लालसर भाजून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
– आता छोट्या कुकरमध्ये तेलं टाकून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करून घ्या आणि मिक्सरमधील वाटण आणि लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ टाकून परतवून घ्या.
– आता उकळलेली भाजी टाकून परत १ मिनिटं परतवून घ्या. जेवढा रस्सा हवा असेल तेव्हढं गरम पाणी आणि गूळ टाकून शिट्टी लावून २ शिट्ट्या करून घ्या.
– कुकर थंड झालं कि झाकण काढून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा.
Bhakti D MBA in HR and Finance who found her love and passion in cooking and writing. She enjoys experimenting new recipes as much as enjoy playing with her son, she also brings her expertise as a parent and a qualified professional to WSL